कोलंबोः निदहास ट्रॉफीतील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशनं श्रीलंकेवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली असली, तरी त्यांच्या अखिलाडू वृत्तीमुळे ते कौतुकाऐवजी टीकेचंच लक्ष्य ठरलेत. पंचांचा एक निर्णय न पटल्यानं त्यांनी मैदानावर 'राडा' केलाच, पण नंतर ड्रेसिंग रूममध्येही त्यांनी रागाच्या भरात तोडफोड केली. त्याचा त्यांना चांगलाच फटका बसू शकतो.
झालं असं की, सामन्याच्या शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. हा चेंडू षटकातील दुसरा बाउन्सर असतानाही पंचांनी नो-बॉल का दिला नाही, असा आक्षेप घेत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं हुज्जत घातली. त्यानं आपल्या फलंदाजांना सामना सोडून माघारी यायला सांगितलं. त्यामुळे पाच मिनिटं खेळ थांबला. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हा वाद मिटवला. त्याचवेळी, बांगलादेशचे फलंदाज मैदानावर गेले नाहीत, तर संघ अपात्र ठरेल आणि श्रीलंका अंतिम फेरीत जाईल, याची जाणीव बांगलादेशचे व्यवस्थापक खालिद महमूद यांनी यांनी करून दिली. त्यामुळे सामना पुन्हा सुरू झाला आणि बांगलादेशने थरारक विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी पुन्हा अखिलाडू वृत्तीचंच प्रदर्शन केलं.
सामना जिंकल्याच्या उन्मादात त्यांनी मैदानावर जाऊन नागिन डान्स करत श्रीलंकेला डिवचलं. श्रीलंकेच्या खेळाडूंच्या अंगावरही ते धावून गेले. हे कमी म्हणून की काय, ड्रेसिंग रूममध्येही बांगलादेशी खेळाडूंनी काचा फोडल्याचं समोर आलंय. त्याची गंभीर दखल घेत, सामनाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज पाहून दोषींना शोधण्याच्या सूचना दिल्यात. दुसरीकडे, बांगलादेशच्या संघ व्यवस्थापनानं नुकसानभरपाई देण्याची तयारी दाखवून, हा प्रताप आपल्याच शिलेदारांनी केल्याची कबुली दिलीय. त्यांना आयसीसी कशी अद्दल घडवते, हे पाहावं लागेल.