दुबई : भारताचे पंच नितीन मेनन यांची २०२०-२१ या मोसमासाठी आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांची भूमिका बजावण्यासाठी आयसीसी प्रत्येक वर्र्षी एलिट पॅनलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पंचांचा समावेश करते. गेल्या काही काळात नितीन मेनन यांची स्थानिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता त्यांची एलिट पॅनलमध्ये निवड झाली आहे.
श्रीनिवास वेंकटराघवन व सुंदरम रवी यांच्यानंतर एलिट पॅनलमध्ये स्थान मिळालेले मेनन हे भारताचे तिसरे पंच ठरले आहेत. मेनन यांनी आतापर्यंत तीन कसोटी, २४ एकदिवसीय व १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत पंचांची भूमिका निभावली आहे. आयसीसीचे महाव्यवस्थापक ज्योफ आलार्डिस, माजी खेळाडू संजय मांजरेकर, सामनाधिकारी रंजन मदुगले व डेव्हिड बून यांच्या समितीने मेनन यांचीनिवड केली आहे. यामुळे मेनन यापुढे भारताव्यतिरिक्त अन्य देशांतील सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावतील. मेनन गेल्या १३ वर्षांपासून पंचाची भूमिका वठवित आहेत. माजी आंतरराष्टÑीय पंच नरेंद्र मेनन यांचे पुत्र नितीन यांच्याव्यतिरिक्त या पॅनलमध्ये अलिम दार, कुमार धर्मसेना, मारियस इरॅस्मस, ख्रिस गॅफनी, मायकल गॉग, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबुरो, ब्रूस आॅक्सनफर्ड, पॉल रेफेल, रॉड टकर व जोएल विल्सन यांचा समावेश आहे.एलिट पॅनलमध्ये निवड झाल्यानंतर मेनन यांनी आनंद व्यक्त केला आहे. एलिट पॅनलमध्ये माझा सहभाग होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे जबाबदारी अधिक वाढणार असून चांगले काम अपेक्षित आहे याची मला जाणीव आहे. यापुढे मिळेल त्या संधीचा चांगला वापर करण्याचे मी निश्चित केल्याची प्रतिक्रि या मेनन यांनी आयसीसीच्या संकेतस्थळाशी बोलताना दिली.