बर्मिंघम : इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाला असला तरीही अंतिम अकरा खेळाडूंत बदल न करण्याचा सल्ला माजी कर्णधार सौरव गांगुली याने दिला आहे. उलट, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी, असे मत त्याने व्यक्त केले.
गांगुलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यात त्याने म्हटले की, जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक धाव बनवावी लागेल. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका आहे. आणि मला वाटते की भारतीय संघात पुनरागमन करण्याची क्षमता आहे. अजिंक्य रहाणे आणि मुरली वियज यांना अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, कारण या दोघांनी अशा परिस्थितीत धावा केल्या आहेत.
गांगुली म्हणाला, मी पराभवासाठी कर्णधाराला जबाबदार धरणार नाही. जर तुम्ही कर्णधार असाल तर तुमच्यावर टीका ही होणारच. जिंकल्यानंतर शुभेच्छाही मिळतात. कोहलीवर टीका यासाठी सुद्धा होत आहे, कारण त्याने आपल्या फलंदाजांना बाहेर खेळण्यापूर्वी काही संधी द्यायला हव्यात.
इंग्लंडच्या परिस्थितीत स्विंगपुढे अपयशी ठरणे हे बहाणे चालणार नाहीत. कारण प्रत्येकालाच इंग्लंडमधील स्थिती माहीत आहे. हेसुद्धा खरे आहे की, नेहमी अंतिम अकरामध्ये बदल केल्यामुळे खेळाडूंच्या मनात भीती असते की एवढ्या वर्षांनंतरही व्यवस्थापनाचा विश्वास जिंकण्यात आपण अपयशी ठरत आहोत. अंतिम अकरात बदल नको, असा सल्लाही त्याने या वेळी दिला. (वृत्तसंस्था)
Web Title: No change in final: Sourav Ganguly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.