मुंबई : हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शुक्रवारी कारवाईचा बडगा उचलला. या प्रकरणाच्या तपासासाठी बीसीसीआयने सहा सदस्यीय समिती नेमली आहे आणि त्यांच्या चौकशीनंतर या दोघांवरील शिक्षा ठरवण्यात येईल. तोपर्यंत हे दोघेही बीसीसीआय, आयसीसी किंवा संलग्न राज्य संघटनांच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. त्यांच्यावरील शिक्षेचा कालावधी वाढला, तर ते आयपीएलमध्येही खेळू शकणार नाही.
पण, ते मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतही खेळू शकणार नाही, तसे संकेत प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडुल्जी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून दिले. भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार यांनी पांड्या व राहुल यांच्यावर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका घेतली होती. या दोघांवर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांना जवळपास दहा मालिका संघाबाहेर ठेवावे, अशी मागणीच त्यांनी केली होती.
'' खेळापेक्षा, या संस्थेपेक्षा कोणी मोठा नाही. खेळाडूंच्या करारात काही नियम आहेत आणि त्याचे पालन केले गेलेच पाहिजे. खेळाडूंनी त्यांची जबाबदारी जाणून घ्यायला हवी. अशा प्रकारची विधानं बीसीसीआयची प्रतिमा मलिन करतात. त्यांना आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावलं आहे. आता ते ऑस्ट्रेलियात काय करणार? ते तेथे सुट्टीवर गेलेले नाहीत,''असे मत एडुल्जी यांनी व्यक्त केले.
प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोघांना दोन सामन्यांच्या बंदीची मागणी केली होती, परंतु एडुल्जी कठोर कारवाईच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळेच दोघांना मायदेशात बोलावण्यात आले.