वेलिंग्टन - उद्यापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण या मैदानाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड फारच रोचक राहिलेला आहे. त्यामुळे जर एखाद्या संघाला सामना जिंकायचा असेल, तर त्याने टॉस जिंकल्यावर नेमकं काय करायला हवं, ते जाणून घ्या...
या खेळपट्टीवर सुरुवातीला गोलंदाजांना चांगली मदत मिळते, पण अखेरच्या काही दिवसांमध्ये खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या सामन्यात टॉस जिंकल्यावर कोणत्याही संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारणे योग्य ठरू शकते. कारण आतापर्यंत या मैदानात ५२ कसोटी सामने झाले आहेत. या ५२ कसोटी सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ फक्त १० वेळाच विजयी ठरला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ २२ वेळा विजयी ठरलेला आहे. त्यामुळे जर एखाद्या संघाने नाणेफेक जिंकली तर त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे, असे या रेकॉर्डवरून वाटत आहे.
पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट; कधी पडणार पाऊस जाणून घ्या...वेलिंग्टन - टी-20 मालिकेत भारताने आणि एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर आता दोन्ही संघ कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पाऊस हा खलनायक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वर्चस्व राखून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कामय राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर एकदिवसीय मालिकेनंतर कसोटीतही भारताला धक्का देण्यास यजमान न्यूझीलंडचा संघ उत्सुक असेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात ७० टक्के पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सामन्यामध्ये कधीही पावसाची रिपरिप सुरु होऊ शकते. त्याचबरोबर या मैदानात जोरात वारे वाहू लागतात. त्यामुळे या मैदानात प्रथम फलंदाजी करणे कठिण समजले जाते. जर पहिल्या दिवशी पाऊस पडला तर कोणत्याही फलंदाजासाठी ती वाट बातमी असेल.
दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीची बॅट न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत म्हणावी तशी तळपलेली नाही. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्यास तो उत्सूक असेल. या मालिकेमध्ये तीन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी विराटकडे असेल.