वेलिंग्टन - भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात २८ षटकांत ३ बाद ७९ अशी मजल मारली होती. यावेळी भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल हा चांली फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या सत्रात त्याला एक जीवदान मिळाले. पण त्यानंतर नेमके झाले तरी काय...
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के बसले. त्यामुळे पहिल्या डावातील २८ षटकांत भारताला उपहारापूर्वी ३ बाद ७९ अशी मजल मारता आली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले.
उपहारानंतर सातव्या षटकात मयांकला ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. बोल्टच्या या चेंडूवर मयांक स्ट्रेट ड्राइव्ह मारायला गेला. पण त्यावेळी चेंडू हवेत राहीला आणि बोल्टच्या दिशेने गेला. बोल्टने हवेत सूर मारला आणि झेल पकडायला गेला. यावेळी चेंडू बोल्टच्या हातावर बसला. पण बोल्टला तोल सांभाळता आला नाही आणि त्याच्या हातून चेंडू निसटला. यावेळी मयांकला जीवदान मिळाले.
मयांकला ३५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले होते. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव घेता आली नाही. पण तिसऱ्या चेंडूवर मयांक मोठा फटका मारायला गेला आणि आपली विकेट गमावून बसला. मयांकला यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ३४ धावा करता आल्या.