मुंबई - सध्या आयसीसीने पुढच्या काळात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषकाची लोकप्रियता वाढत असतानाच वनडे विश्वचषक अधिक रोमांचक व्हावा यासाठी आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे. त्याचा एक भाग म्हणून २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेत १० ऐवजी १४ संघ खेळवण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. यामधील टॉप १० संघ क्रमवारीनुसार थेट पात्र ठरतील. तर उर्वरित ४ संघ क्वालिफायरमधून स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
२०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकामध्ये केवळ १० संघ सहभागी होतील. त्यासाठी वनडे सुपर लीग खेळली जाईल. तसेच लहान संघांना मोठ्या स्पर्धेशी जोडण्यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. २०२३ च्या वर्ल्डकपसाठी सुरू करण्यात आलेल्या सुपर लीगमध्ये १२ पूर्ण सदस्यांसोबतच नेदरलँड्सचा संघाला संधी देण्यात आली आहे. प्रत्येक संघ ८ मालिका खेळेल. त्यातील ४ मालिका मायदेशात आणि चार मालिका ह्या परदेशात खेळल्या जातील. मात्र हा नियम २०२७ च्या विश्वचषकासाठी संघाची संख्या वाढवण्यासोबतच संपुष्टात येईल.
दरम्यान २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी महत्त्वपूर्ण बदलाला मान्यता दिली आहे. त्यानुसार दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये एकूण १४ संघ खेळणार आहेत हे निश्चित झाले आहे.
काही दिवसांपूर्वी आयसीसीने २०२४ ते २०३१ या काळात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. २०२७ च्या विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया या देशांना देण्यात आले आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आते त्याशिवाय २०२६ चा टी-२० विश्वचषक, २०२९ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०३१ चा एकदिवसीय विश्वचषक भारतात आयोजित होणार आहे.
Web Title: ODI World Cup: The ODI World Cup will be more exciting now, the ICC has made a big decision
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.