मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे. विराट-अनुष्काच्या फॅन्सबरोबरच मीडियामध्येही लग्नाचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे. गुरूवारी रात्री उशिरा अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या कुटुंबीयांबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसली. शर्मा कुटुंबीय इटलीला जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. इटलीला विरूष्का डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी खासगी कारण देऊन विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या या निर्णयानंतर विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. विरूष्काच्या लग्नासाठी पंडितही इटलीला रवाने झाले आहेत. त्याचबरोबर अनुष्काच्या वडिलांनी त्यांच्या इमारतीतील काही जवळच्या शेजाऱ्यांना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे.
विरूष्काच्या इटलीमध्ये होणाऱ्या लग्नाला विराट व अनुष्काचे काही जवळचे नातेवाईक व मित्रमंडळीच असणार आहेत. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने त्याच्या जवळच्या सुत्रांशी बोलताना सांगितलं की, या लग्नात ते जास्त लोकांना निमंत्रण देऊ शकत नाही. लग्नासाठी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय हजर असतील.
दुसरीकडे, टीम इंडियाचे सगळे खेळाडू 10 डिसेंबरपासून होणाऱ्या श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत व्यस्त असतील. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडुंना विरूष्काच्या लग्नाला हजेरी लावणं कठीण आहे. पण सुत्रांच्या माहितीनुसार, विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगला लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. तसंच विराटने त्याचे लहानपणाचे क्रिकेटगुरू राजकुमार यांनीही लग्नाचं निमंत्रण दिलं आहे.
विराट आणि अनुष्का गेल्या चार वर्षापासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. याआधीही दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्या चर्चेला पूर्णविराम विरूष्काने लगेचच दिला होता.