कानपूर : न्यूझीलंडविरुद्ध २५ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रतिभावान युवा फलंदाज शुभमन गिल याला मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठविण्याची योजना भारतीय संघ व्यवस्थापन आखत आहे. मोठ्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत गिलची क्षमता ओळखता येईल, असे बीसीसीआयला वाटते. कानपूर कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी करण्याची जबाबदारी तुझ्याकडे असेल, असे गिलला सांगण्यात आल्याचे कळते.
विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व असेल. दोन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा खेळणार नसल्याने मधल्या फळीत गिलला फलंदाजीची संधी देत त्याच्या खेळातील कौशल्य तपासले जाईल. शानदार लयीमध्ये असलेला लोकेश राहुल हा मयंक अग्रवालसोबत सलामीला येणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचे मत असे की, कोहलीशिवाय मधल्या फळीत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणू शकेल, असा किमान एक फलंदाज असावा, असे व्यवस्थापनाला वाटते. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांची शैली जवळपास सारखी आहे.
न्यूझीलंडविरुद्ध ऋद्धिमान साहा मुख्य यष्टिरक्षक आहे. ऋषभ पंतच्या तुलनेत तो बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रोहित, कोहली आणि पंतच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत फलंदाजीसाठी आक्रमक खेळाडूची गरज भासेल. अशावेळी गिल उपयुक्त ठरतो. अनेक फटके मारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. नव्या चेंडूवर त्याला धावा काढणे जमते. याविषयी विचारताच परांजपे पुढे म्हणाले, ‘राहुलने कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत धावा काढल्या आहेत. शुभमन हा कित्ता गिरवू शकतो.
युवा फलंदाज या नात्याने गरजेनुसार तो खेळ करू शकेल. गिल मधल्या फळीत यशस्वी ठरल्यास कोहली आणि रोहित यांच्या पुनरागमनामुळे पुजारा आणि रहाणे यांच्यावर चांगल्या कामगिरीसाठी दडपण वाढत जाईल. निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यर याला मधल्या फळीतील तज्ज्ञ फलंदाज म्हणून निवडले आहे, मात्र मुंबईच्या श्रेयसला कसोटी पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. परांजपे यांच्या मते, काही काळानंतर श्रेयसला संधी मिळू शकेल. पुजारा आणि रहाणे यांच्यानंतर विहारी, शुभमन, श्रेयस यांच्यातच मधल्या फळीसाठी मोठी चढाओढ असेल.’