भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना शुक्रवारी मध्यरात्री छातीत दुखू लागल्यानं Fortis Escorts Heart Institute येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मध्यरात्री १ वाजता अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे फोर्टीसच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कपिल देव यांनीही रात्री उशीरा ट्विट करून सर्वांचे आभार मानले.
१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य मदन लाल यांनी सांगितले की,''कपिल देव यांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी यासाठी सर्वांनी प्रार्थना करा. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कपिल देव यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. डॉक्टरांच्या माहितीनुसार आता त्यांची प्रकृती बरी आहे आणि काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. डॉक्टरांनी ६१ वर्षीय कपिल देव यांना ३ आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ''
कपिल देव यांनी ट्विट केलं की,''तुम्ही दाखवलेलं प्रेम व शुभेच्छा यांच्याबद्दल मी आभारी आहे. तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. लवकर बरा होईन.''