नवी दिल्ली : पाकिस्तान आणि नेदरलॅंड (PAK vs NED) यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. मंगळवारी झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. नेदरलॅंडनेही कडवी झुंज दिली परंतु यजमान संघाला विजय मिळवण्यात यश आले नाही. पाकिस्तानकडून १०९ धावांची शतकी खेळी करणारा फखर झमान (Fakhar Zaman) विजयाचा हिरो ठरला. झमानने केलेल्या शतकी खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
फखर झमानने झळकावले शतक
दरम्यान, फखर झमानची चर्चा रंगली आहे त्याचे कारण भलतेच आहे. खरं तर फखर ४१ धावा करून खेळपट्टीवर टिकून असताना असे काही झाले ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले. अचानक आलेल्या मधमाशीने फखर झमानच्या हाताचा चावा घेतला आणि सामन्यात व्यत्यय आणला. यामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला होता. मात्र थोड्यावेळानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला ही सर्व घटना पाकिस्तानच्या डावाच्या १७ व्या षटकात घडली होती.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ६ गडी गमावून ३१४ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये फखर शिवाय कर्णधार बाबर आझमच्या (७४ धावा) आणि शादाब खानच्या नाबाद (४८) धावांच्या खेळीचा समावेश होता. यजमान संघाकडून बास डी लीडे आणि लोगान व्हॅन बीक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
नेदरलॅंडची कडवी झुंज
प्रत्युत्तरात नेदरलॅंडचा संघ १६ धावांनी आव्हानापासून दूर राहिला आणि सामना गमवावा लागला. नेदरलॅंडकडून विक्रमजीत सिंग (६५), टॉम कूपर (६५ धावा) आणि कर्णधार स्कॉट ॲडवर्ड्सने नाबाद ७१ धावांची खेळी करून कडवी झुंज दिली. पाकिस्तानकडून हारिस रौफ आणि नसीम शाह या दोघांनी प्रत्येकी ३-३ बळी पटकावले.
Web Title: PAK vs NED Pakistan's Fakhar Zaman was stung by a bee during in a 1st odi live match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.