पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात १७ सप्टेंबर रोजी सुरू होणारी मालिका रद्द होण्याच्या प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडच्या संघाला घाबरवण्याचं काम भारतातून झाल्याचा गंभीर आरोप पाकिस्ताननं केला आहे. न्यूझीलंडच्या संघाला धमकीचे ई-मेल ज्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर पाठवण्यात आला आहे तो भारतातील असल्याचा आरोप पाकिस्तानच्या केंद्रीय सूचना मंत्र्यानं केला आहे.
'आधी एकच शत्रू होता आता दोन आणखी वाढले, बदला घेऊ'; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा संतापले!
पाकिस्तानचे केंद्रीय सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. तहरीक-ए-तालिबानच्या एहसानुल्लाह एहसान याच्या नावानं न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाला एक धमकीचे ई-मेल करण्यात आला. पण हा ई-मेल भारतातून पाठवण्यात आला आहे. यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं दौऱ्यातून माघार घेतली. त्यामुळे या सर्व प्रकरणाला भारत जबाबदार असल्याचं फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे.
'इंग्लंडला धूळ चारणार', पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर भडकला शोएब अख्तर!
"पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी, मंत्रालयाचं सुरक्षा पथक आणि इतर सर्व सदस्यांनी न्यूझीलंडला पाठविण्यात आलेल्या ई-मेलची माहिती मागवली. पण त्यांनाही जितकं आम्हाला माहिती मिळाली आहे तितकीच माहिती त्यांच्याकडे आहे. व्हिपीएनचा वापर करुन संबंधित ईमेल पाठविण्यात आला आहे. त्याचं लोकेशन सिंगापूर असं दाखवण्यात आलं आहे आणि ज्या डिव्हाइसमधून ई-मेल पाठविण्यात आला आहे ते भारतातील आहे. यासाठी फेक ई-मेल आयडीचा वापर करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात ई-मेल भारतातील महाराष्ट्र राज्यातून पाठवण्यात आला होता", असं पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे.
न्यूझीलंडचा संघ तब्बल १८ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. पण १७ सप्टेंबर रोजी सामना सुरू होण्याच्या काही तास आधीच न्यूझीलंडच्या संघानं सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला. त्यानंतर क्रिकेट विश्वात याची जोरदार चर्चा सुरू झाली. न्यूझीलंडनं दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर आता इंग्लंडनंही ऑक्टोबरमधील आपला नियोजित पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.