पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. शरीरानं थोडा स्थूल असल्यानं इंझमामला चपळाईनं धावा काढणं, चोरटी धाव घेणं फारसं शक्य व्हायचं नाही. मात्र ही कमतरता इंझमाम मोठे फटके मारुन भरुन काढायचा. पाकिस्तानकडून साडे तीनशेहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारा इंझमाम खेळपट्टीवर असला की, धावचीत होणं जवळपास निश्चित असायचं. इंझमाम स्वत: तरी धावबाद व्हायचा, किंवा मग त्याच्यासोबत फलंदाजी करणारा दुसरा खेळाडू तरी धावबाद व्हायचा. आता तसाच प्रकार इंझमामच्या भाच्यासोबत घडलाय.इंझमाम धावबाद झाल्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ यूट्युबवर पाहायला मिळतात. आता या व्हिडीओंमध्ये आणखी एकाची भर पडलीय. मात्र हा व्हिडीओ आहे इंझमामचा भाचा इमाम-उल-हकचा. पाकिस्तान संघ नॉर्दम्टनशायर संघाविरुद्ध खेळत असताना इमाम फलंदाजी करत होता. त्यानं चेंडू फाईन लेगला ढकलला आणि धावण्यास सुरुवात केली. इमाम धावत असताना त्यानं त्याच्यासोबत फलंदाजी करत असलेल्या अझर अलीकडे पाहणं गरजेचं होतं. मात्र इमाम चेंडूकडे पाहत राहिला.
चेंडूकडे पाहत धावत असलेला इमाम आणि अझरची धडक होणार होती. ही बाब लक्षात येताच अझरनं ही धडक टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र इमाम समोर बघून धावतच नसल्यानं दोघे एकमेकांना धडकले. त्यामुळे अझर धावचीत झाला. या प्रसंगामुळे अनेकांना इंझमामच्या रनिंग बिटविन द विकेटची आणि त्यावेळी होणाऱ्या रन आऊट आठवण झाली. हा सामना पाकिस्ताननं 9 गडी राखून जिंकला. या सामन्यात इमाम-उल-हकनं 59 धावांची खेळी साकारली.