T20 World Cup 2024 : २००९चा विजेता आणि २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलिस्ट पाकिस्तान संघ अमेरिका व वेस्ट इंडिज येथे पार पडत असलेल्या वर्ल्ड कपमधून पहिल्याच फेरीत बाद झाला. अ गटात त्यांना अमेरिकेकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला, तर भारताने त्यांच्या जबड्यातून विजय खेचून आणला. या दोन पराभवांमुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हा संपुष्टात आले आणि काल त्यांना आयर्लंडविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात १०७ धावा करतानाही प्रचंड घाम गाळावा लागला. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) वर्ल्ड कप विजेता मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन ( Gary Kirsten ) यांची कोच म्हणून नियुक्ती केली. पण, संघाला अपेक्षित निकाल नोंदवता आला नाही.
पाकिस्तानच्या वर्ल्ड कप एक्झिटनंतर कर्स्टन यांनी धक्कादायक विधान केले आहे आणि त्यांनी संघातील दुफळी उघड्यावर आणली आहे. कर्स्टन यांनी असे विधान केल्याचे दावे पाकिस्तानी मीडियाने केले आहेत. त्यांनी दिलेल्या वृत्तांनुसार, संघाने एकात्मतेवर, फिटनेसवर आणि आपले कौशल्य सुधारणेवर भर द्यायला हवा, असे स्पष्ट मत कर्स्टन यांनी मांडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कर्स्टन यांनी खेळाडूंशी सहज गप्पा मारल्या आणि त्यांनी तुमची फिटनेस चांगली नसल्याची खेळाडूंना सांगितले. हा संघ म्हणून एकसंध नाही असेही त्यांनी म्हटले.
एवढं क्रिकेट खेळूनही या खेळाडूंना कोणता फटका कसा मारायचा हेही माहित नसल्याचे कर्स्टन म्हणाले. "पाकिस्तान संघात एकता नाही, ते त्याला संघ म्हणतात, पण तो संघ नाही. ते एकमेकांना सपोर्ट करत नाहीत; सगळे वेगळे आहेत. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. अनेक संघ पाहिले आहेत, पण मी अशी परिस्थिती पाहिली नाही,"असेही ते म्हणाले.
गॅरी कर्स्टन यांनी खेळाडूंना सांगितले की, "तुम्हाला जगात स्पर्धा करायची असेल, तर तंदुरुस्ती आणि कौशल्य सुधारावे लागेल आणि एकजूट राहावे लागेल. फिटनेसच्या बाबतीत तुम्ही खूप मागे आहात, ज्या खेळाडूंना त्यांच्या तंदुरुस्तीत सुधारणा करायची आहे तेच संघात राहतील. "