इस्लामाबाद : माजी पाकिस्तानी ऑलराऊंडर अब्दुल रझ्झाकने पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंवर मत प्रदर्शन केले आहे. याआधी त्याने हार्दिक पांड्याला चांगला ऑलराऊंडर बनण्यासाठी मदत करण्याची तय़ारी दर्शविली होती. तसेच जसप्रीत बुमराला 'बेबी बॉलर' म्हटले होते. आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर रझ्झाकने मत व्यक्त केले आहे.
रझ्झाक याने कोहलीच्या यशाला बीसीसीआयला जबाबदार म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानमध्येही अनेक खेळाडू असे आहेत जे विराट कोहलीपेक्षा जास्त सरस आहेत, अशी टिप्पणीही केली आहे. पाक पॅशनला दिलेल्या मुलाखतीत रझ्झाकने हे वक्तव्य केले आहे.
विराट कोहली हा चांगला क्रिकेटपट्टू आहे. याचबरोबर विराट खूप भाग्यवानही आहे की त्याला बीसीसीआयचा पाठिंबा आहे. याबाबत कोणताही संदेह नाही. बीसीसीआयचा त्याला पूर्ण पाठिंबा आणि विश्वास असल्याने तो चांगली कामगिरी करू शकतो. खेळाडूंच्या यशासाठी असा पाठिंबा खूप महत्वाचा असतो. बीसीसीआयकडून त्याला जो सन्मान मिळतो त्यामुळे विराटला काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते याचा परिणाम सर्वांसमोर आहे, असेही रझ्झाकने सांगितले.
एकीकडे विराट कोहलीची प्रशंसा करताना रझ्झाकने पाकिस्तान बोर्डावर टीकाही केली आहे. पाकिस्तानमध्ये असे खेळाडू आहेत जे विराट कोहलीपेक्षाही चांगले खेळू शकतात. मात्र, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड गुंतवणूक करण्यासाठी तयार झाली पाहिजे. मला वाटते की इथे पाकिस्तानमध्ये असे खेळाडू हजर आहेत जे विराट कोहलीपेक्षा चांगले बनू शकतात. मात्र आमच्या सिस्टिमने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, जे वाईट आहे. कोहलीने त्याच्यावर दाखविलेला विश्वास योग्य ठरवला, असे मत रझ्झाकने व्यक्त केले आहे.