पाकिस्तानातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना बांगलादेश क्रिकेट संघानं पाक दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. श्रीलंकेनं कसोटी आणि ट्वेंटी-20 मालिकेसाठी पाक दौरा केला. मात्र, त्यानंतरही बांगलादेश क्रिकेट मंडळानं घेतलेला पवित्रा पाक मंडळाला पटलेला नाही. पण, आता वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं पाकिस्तान हे जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल म्हणाला,''जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी पाकिस्तान हे एक आहे.'' बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये चत्तोग्रामा चॅलेंजर संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेल ढाका येथे दाखल झाला. पाकिस्तानात खेळाडूंना राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. ढाका येथे पत्रकारांनी पाकिस्तानबाबत प्रश्न विचारला. तो म्हणाला,''पाकिस्तान हे जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक आहे. ते खेळाडूंना राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा पुरवत आहेत. त्यामुळे तुम्ही सुरक्षित हातात आहात. बांगलादेशमध्येही आम्ही सुरक्षित आहोत.''
यावेळी गेलनं निवृत्तीबाबतही मोठं विधान केलं. तो म्हणाला,''अजूनही मी पाच वर्ष खेळू शकतो. अजूनही अनेकांना गेलला मैदानावर खेळताना पाहायचे आहे. माझंही क्रिकेटवर तितकंच प्रेम आहे. त्यामुळे जमेल तितकी वर्ष मी क्रिकेट खेळत राहणार आहे.''