पाकिस्तानी संघानं सोमवारी झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटीत एक डाव व 147 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. अबीद अली ( 215) व अझर अली ( 126) यांच्या फटकेबाजीनंतर हसन अली, नौमान अली व शाहिद आफ्रिदी यांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेत पाकिस्तानच्या विजयात हातभार लावला. पाकिस्ताननं पहिलाय डाव 8 बाद 510 धावांवर घोषित केला, प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा पहिला डाव 132 व दुसरा डाव 231 धावांवर गडगडला. बाबर आजमच्या ( Babar Azam ) नेतृत्वाखाली पाकिस्ताननं याआधी ट्वेंटी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता.
झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात हसन अलीनं 27 धावांत 5 विकेट्स घेतल्या. साजीद खाननं दोन, शाहिन आफ्रिदी व तबीश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात झिम्बाब्वेकडून थोडा संघर्ष पाहायला मिळाला. रेगीस चाकब्वा ( 80) व कर्णधार ब्रेंडन टेलर ( 49) यांनी चांगला खेळ केला. पण, नौमन अली ( 5-86) व शाहिन ( 5-52) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. बाबर आजम यानं कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सलग चार सामने जिंकले. असा पराक्रम करणारा तो पहिलाच पाकिस्तानी खेळाडू आहे. शिवाय प्रथम पाकिस्तानच्या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांनी सर्व दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
आयसीसीचा पुरस्कार...एप्रिल महिन्याच्या सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानच्या बाबर आजमला मिळाला. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली. त्यानं या महिन्यात तीन वन डे सामन्यांत 76च्या सरासरीनं 228 धावा केल्या, तर सात ट्वेंटी-20 सामन्यांत 305 धावा केल्या. शिवाय जागतिक वन डे फलंदाजांमध्ये त्यानं अव्वल स्थानही पटकावले.