रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या होत्या. पुलावामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा टीम इंडियाचा हा एक प्रयत्न होता. त्यामुळे त्यांनी आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या आणि आपल्याचे सामन्याचे शुल्क राष्ट्रीय संरक्षण निधीकडे सुपूर्द केले. या साऱ्या गोष्टींना पाकिस्तानला जळफळाट झाल्याचे पाहायला मिळाले. कारण पाकिस्तानने याबाबत थेट आयसीसीकडे तक्रार केली आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी " आयसीसीने भारताविरुद्ध कारवाई करायला हवी. जर आयसीसीने कारवाई केली नाही तर आम्ही विश्वचषकात काळ्या पट्ट्या बांधून निषेध करू." असे म्हटल्याचे रेडिओ पाकिस्तानने सांगितले आहे.
How's The Josh... धोनीने सामन्यापूर्वी टीम इंडियाला दिल्या आर्मीच्या कॅप्सपुलवामा येथे दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारीला हल्ला केला, त्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले. या शहीद जवानांना सॅल्यूट करण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या. धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. केदार जाधवने ही कॅप घेताना लष्करातील जवानांप्रमाणे कडकडीत सॅल्यूट केला.त्याचबरोबर या सामन्याचे शुल्क सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय संरक्षण निधीला देण्याचे ठरवले आहे.
रांची हे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे शहर. त्यामुळे सामन्यापूर्वी धोनीने भारताच्या आर्मीच्या कॅप्स टीम इंडियाला दिल्या. त्याचबरोबर देशवासियांनी राष्ट्रीय संरक्षण निधीला सढळ हस्ते मदत करावी, जेणेकरून शहीद जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल, असा संदेशही यावेळी देण्यात आला आहे.
नाणेफेकीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हीच आर्मी कॅप घालून आला होता. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आर्मीच्या कॅप्स घातल्यानंतर आपल्या भावनाही व्यक्त केल्या. कोहली यावेळी म्हणाला की, " दहशतवादी हल्ल्यात जे भारतीय जवान शहीद झाले त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्यासाठी आम्ही आज आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या आहेत. त्याचबरोबर आजच्या सामन्याचे सर्व शुल्क आम्ही राष्ट्रीय संरक्षण निधीला देण्याचे ठरवले आहे. देशवासियांनीही या निधीला सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन मी करत आहे. कारण या निधीचा फायदा शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे."