ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दारूण पराभव केला. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ आणि दुसऱ्या डावात २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात २६४ आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या. खरं तर पाकिस्तानला मागील २८ वर्षांमध्ये एकदाही ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने १० बळी घेतल्याने त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी संघाचा संचालक मोहम्मद हफिजने एक भन्नाट कारण दिलं. पंचांची एक चूक आम्हाला महागात पडली असे त्याने सांगितले. तो म्हणाला की, एक संघ म्हणून आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आम्ही सांघिक खेळी केली. मात्र, आम्ही ५२ अतिरिक्त धावा दिल्या, त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले. तसेच १२४ धावांवर १ गडी गमावल्यानंतर पाच फलंदाज झटपट बाद झाले. आम्ही हरलो असलो तरी इतर संघांपेक्षा चांगले क्रिकेट खेळलो.
कमिन्सनं घेतली फिरकी हफिजच्या विधानावर व्यक्त होताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले, "होय ते बरोबरच आहे, ते चांगले क्रिकेट खेळले. सामना जिंकल्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, ते कसे खेळले याने फारसा फरक पडत नाही. शेवटी कोण जिंकतो हे महत्त्वाचे असते."
शेजाऱ्यांचा दारूण पराभव ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३१८ धावा केल्या होत्या. यजमान संघाकडून मार्नस लाबूशेनने १५५ चेंडूंचा सामना करत ६३ धावा केल्या. तर, सलामीवीर उस्मान ख्वाजाने ४२ आणि डेव्हिड वॉर्नरने ३८ धावांचे योगदान दिले. मिचेल मार्शने ४१ धावा केल्या. यादरम्यान पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना झमालने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर शाहीन आफ्रिदी, मीर हमजा आणि हसन अली यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले.
ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आणि दुसरा सामना जिंकण्यासाठी ३१७ धावांची गरज होती. मात्र, शेजाऱ्यांना सर्वबाद केवळ २३७ धावा करता आल्या. या डावात कर्णधार शान मसूद सर्वाधिक ६० धावा करून बाद झाला. बाबर आझमने ४१ धावांची सावध खेळी केली. तर, रिझवानने ३५ धावांचे योगदान दिले. या मालिकेतील पाकिस्तानी संघाचा सलग दुसरा पराभव झाला अन् २८ वर्षांची परंपरा कायम राहिली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने दुसऱ्या डावातही कमाल केली. त्याने १८ षटकात ४९ धावा देत ५ बळी पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे कमिन्सने दोन्ही डावात ५-५ बळी घेऊन सामनावीर पुरस्कार पटकावला.