Pollard, IND vs WI 1st ODI: भारताविरूद्ध वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. रोहित शर्माच्या टीम इंडियापुढे कायरन पोलार्डच्या वेस्ट इंडिजचा निभाव लागला नाही. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २८ षटकं खेळून १७८ धावा केल्या. जेसन होल्डरने एकमेव अर्धशतक झळकावलं. त्याला अँलनने (२९) थोडी साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने ६० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर पोलार्डने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
कर्णधार पोलार्ड काय म्हणाला?
- २२ षटकं राखून पराभूत होणं लज्जास्पद आहे. वन डे सामन्यात आमच्या फलंदाजांना ५० षटकेही पूर्ण फलंदाजी करता आली नाही ही शरमेनं मानी खाली जाणारी गोष्ट आहे. या गोष्टीवर आम्ही नक्कीच विचार करू.
- पुढच्या सामन्यांआधी आम्हाला थोडा खोलात जाऊन विचार करावा लागेल आणि माझ्यासकट सगळ्यांना तांत्रिकदृष्ट्या थोडा खेळ सुधारावा लागेल.
- आम्ही फलंदाजी करत असताना चेंडू टप्पा पडल्यावर स्पिन होऊन संथ व्हायचा. पण संध्याकाळनंतर चेंडू टप्पा पडून वेगाने पुढे जायचा. त्यामुळे दोन वेगळ्या परिस्थितीत कसं खेळायचं याचा आम्हाला काहीतरी मार्ग काढावाच लागणार आहे.
- खालच्या फळीत जेसन होल्डर आणि फॅबियन अँलन दोघांनी चांगली फलंदाजी केली. अल्झारी जोसेफ आणि अकील होसेन यांनी गोलंदाजीत चांगली धार दाखवली. या दोन गोष्टी सकारात्म आहेत आणि त्यासाठी मी आनंदी आहे. आता जास्त काही बोलणार नाही. पुढच्या सामन्यात खेळानेच उत्तर देऊ.
दरम्यान, वेस्ट इंडिजची फलंदाजी खूप वाईट झाली. ७ बाद ७९ अशी अवस्था असताना जेसन होल्डरने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजला १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या फलंदाजी रोहित शर्माने दमदार अर्धशतक लगावले. तो बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव (३४) आणि दीपक हुडा (२६) या दोघांनी नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.