भारताने श्रीलंकेला नमवत आठव्यांदा आशिया चषक उंचावला. त्यामुळे जगभरातून टीम इंडियाचं अभिनंदन करण्यात असून भारतीय खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यातच, श्रीलंकन फलंदाजांना एकापाठोपाठ एक करत तंबूत पाठवणाऱ्या गोलंदाज मोहम्मद सिराजचं कौतुक होत आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह महिला टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजनेही मोहम्मदच्या गोलंदाजीचं कौतुक केलंय. मात्र, मितालीने यावेळी भारतीय संघाचं कौतुक करताना टीम इंडियाऐवजी टीम भारत असं म्हटलंय.
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामना रंगला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने इतिहास रचत केवळ १६ चेंडूत श्रीलंकेचे ५ बळी घेतले. पहिल्या षटकांत जसप्रीत बुमराहने एक बळी घेतल्यानंतर सिराजने यजमानांना मोठे धक्के दिले. सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकन फलंदाजांनी गुडघे टेकल्यामुळे भारताच विजय सहज झाला. श्रीलंकेला ५० धावांवरच रोखल्यानंतर भारताने १० गडी राखून मोठा विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात सिराजचा मोठा वाटा राहिला, त्यामुळेच त्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताबही देण्यात आला. सिराजच्या गोलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, देशात इंडिया आणि भारत नावावरुन वाद सुरू असताना अनेक क्रिकेटर्संनेही या वादावर परखडपणे भाष्य केलं होतं. सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग यांनीही भारत नावाचंच समर्थन केलं होतं. आता, मितालीनेही टीम भारत म्हणत अभिनंदन केल्यामुळे तिच्या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.