मुंबई, प्रो कबड्डी : प्रो कबड्डी लीगच्या 7व्या मोसमासाठी मुंबईत खेळाडूंची लिलाव प्रक्रीया सुरू आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी सिद्धार्थ देशाई आणि नितीन तोमर यांनी कोट्यवधी होण्याचा मान पटकावला. सिद्धार्थ व नितीन यांना अनुक्रमे 1.45 कोटी व 1.20 कोटी रुपयांत तेलगु टायटन्स व पुणेरी पलटन संघांनी आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. या लिलावातील अनेक खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या 72 खेळाडूंपेक्षा अधिक रक्कम मिळवण्याचा मान पटकावला. विशेष म्हणजे सिद्धार्थ व नितीन यांनी भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगपेक्षा अधिक रक्कम पटकावली आहे. मुंबई इंडियन्सने युवराजला 1 कोटींत आपल्या चमूत घेतले होते.
गतवर्षी यू मुंबाने 34 लाखांची बोली लावत सिद्धार्थला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आणि कामगिरीच्या जोरावर त्याने आपली निवड सार्थ ठरवली. प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात त्याने ( 221) सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसरे स्थान पटकावले. त्यात सर्वाधिक 218 गुण त्याने चढाईत पटकावले. प्रो कबड्डीमध्ये सर्वात जलद 100 चढाईच्या गुणांचा विक्रमही त्याने नावावर केला. तेलगु टायटन्सने त्याला 1.45 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
प्रो कबड्डीच्या इतिहासात मोनू गोयत हा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला गतमोसमात हरयाणा स्टिलर्स संघाने 1.51 कोटीत करारबद्ध केले होते. मात्र, या मोसमात यूपी योद्धा संघाने त्याच्यासाठी 93 लाख मोजले. सिद्धार्थसह नितीन तोमरलाही पहिल्या दिवसात करोडपती होण्याचा मान मिळाला. पुणेरी पलटन संघाने त्याला 1.20 कोटीत संघात घेतले. तेलगू टायटन्सने त्यांचा सर्वात यशस्वी खेळाडू राहुल चौधरीला रिटेन केले नाही. तरीही राहुल चौधरीसाठी तमिळ थलायव्हाजने 94 लाख रुपये मोजले.
याव्यतिरित्क गतमोसमात पुणेरी पलटनकडून खेळणारा संदीप नरवाल यंदा यू मुंबाकडून खेळणार आहे. यू मुंबाने त्याला 89 लाखांत आपल्या संघात घेतले. गतविजेत्या बंगळुरू बुल्सने महेंद्र सिंहला 80 लाखांत आपल्याकडे कायम राखले.
आयपीएलमधील काही महत्त्वाचे खेळाडू दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ ( 1.20 कोटी), इशांत शर्मा ( 1.10 कोटी); रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - टीम साउदी ( 1 कोटी), पवन नेगी (1 कोटी); राजस्थान रॉयल्स - स्टुअर्ट बिन्नी ( 50 लाख), धवल कुलकर्णी ( 75 लाख), श्रेयस गोपाळ ( 20 लाख), इश सोढी ( 50 लाख); कोलकाता नाइट रायडर्स - मयांक अग्रवाल ( 1कोटी), मुरुगन अश्विन ( 20 लाख); मुंबई इंडियन्स - जेसन बेहरेनडॉर्फ ( 1 कोटी), मिचेल मॅक्लेघन ( 1 कोटी), युवराज सिंग ( 1 कोटी); चेन्नई सुपर किंग्स - सॅम बिलिंग्स ( 1 कोटी), इम्रान ताहीर ( 1 कोटी), लुंगी एंगीडी ( 50 लाख ); सनरायझर्स हैदराबाद - ऋद्धिमान साहा ( 1.20 कोटी ), मार्टीन गुप्तील ( 1 कोटी ), मोहम्मद नबी ( 1 कोटी).