मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत खेळाडूंनी 'पाकिस्तानशी आता चर्चा करण्यात वेळ दवडू नका, आता चर्चा नको, तर युद्धच पुकारा!', अशी संपत्प प्रतिक्रीया दिली आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे जवानांप्रती असलेले प्रेम सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्याने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवताना पाकिस्तानला धारेवर धरले. गौतम गंभीरसह अनेक भारतीय खेळाडूंनी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या.