नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे पडसाद आता क्रीडा क्षेत्रावरही उमटत आहेत. कारण सीसीआय क्लबनंतर मोहाली आणि राजस्थान क्रिकेट संघटनांनी आपल्या स्टेडियम्समधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो काढले होते. आता भारताची राजधानी दिल्लीमधूनही पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढले जात आहेत.
नवी दिल्लीमध्ये फिरोझशाह कोटला हे क्रिकेटचे स्डेडियम आहे. या स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या वसिम अक्रम, आसिफ इकबाल, इंजमाम उल हक, शोएब अख्तर, जावेद मियांदाद, वकार युनिस यांच्यासह बारा पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या तस्वीरी आहेत. या सर्व तस्वीरी काढण्याचा निर्णय दिल्ली क्रिकेट संघटनेने घेतला आहे.
राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळाडूंच्या फोटोजची गॅलरी आहे. या गॅलरीमधून आता पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढण्यात आले आहेत. पंजाब येथील मोहालीच्या पीसीए स्टेडियममधूनही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या फोटोंना थारा देण्यात आलेला नाही.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने हॉटेलमधील इम्रान खानचा फोटो झाकलाक्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) ने शनिवारी त्यांच्या एका हॉटेलमध्ये लावलेला पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानचा फोटो झाकत पुलवामा हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर क्लबने एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडिअममधील मुख्यालयातील या हॉटेलमधील इम्रान खानचा वॉलपेपर झाकण्याचा निर्णय घेतला. सीसीआई हा बीसीसीआयचा मान्यताप्राप्त क्लब आहे. सीसीआयच्या या हॉटेलमध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या बाजुलाच इम्रान खान यांचा वॉलपेपर लावलेला होता. तो झाकण्यात आला आहे. सीसीआयच्या या क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये 1992 मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतरचा इम्रान खानचा फोटो आहे. यावर सीसीआयचे अध्यक्ष प्रेमल उदाणी यांनी सांगितले की, सीसीआय हा एक खेळाशी संबंधीत क्लब आहे. काश्मीरमधील हल्ल्याचा ऩिषेध व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेतला.