नवी दिल्ली - दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावर भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्याचा आज अखेरचा आणि निर्णायक दिवस आहे. श्रीलंकेची या मालिकेतील कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. खराब कामगिरीशी संघर्ष करणारा श्रीलंका संघ दुसरीकडे प्रदूषणामुळे त्रस्त आहे. मंगळवारी श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमल आणि भारतीय गोलंदाज मोहम्मद शम्मी यांना प्रदूषणाचा त्रास झाल्याचं दिसलं. दोन्ही खेळाडूंनी मैदानातच उलटी केली. दरम्यान श्रीलंका संघाचे मॅनेजर असांका गुरुसिन्हा यांनी मुंबई मिररशी बोलताना माहिती दिली आहे की, 'दोन्ही संघांनी आपापल्या ड्रेसिंग रुममध्ये ऑक्सिजन सिलेंडर लावले आहेत. आपण एखाद्या ड्रेसिंग रुम नाही तर हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये असल्यासारखं वाटू लागलं आहे'.
असांका गुरुसिन्हा बोलले आहेत की, 'खेळाडूंना श्वास घेण्यास त्रास होत असून चेंजिंग रुममध्ये ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर केला जात आहे. डॉक्टरांनी आम्हाला तसा सल्ला दिला आहे. इतकंच नाही भारतीय संघही त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करत आहे'.
श्रीलंका संघाच्या टीम मॅनेजर असांका गुरुसिन्हा यांनी मागणी केली आहे की, भारतात खेळताना फक्त लाइट मीटर नाही तर एअर क्वालिटी मीटरचाही वापर केला जावा. ज्याप्रमाणे लाइट मीटरचा वापर करत खेळण्यासाठी योग्य उजेड आहे की नाही याची पाहणी केली जाते, त्याप्रमाणे एअर क्वालिटी मीटरचा वापर करत हवेची गुणवत्ता खेळण्यासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी व्हावी.
असांका गुरुसिन्हा स्वत: कसोटी खेळाडू होते. त्यांनी आपली ही मागणी आयसीसीपर्यंत पोहोचवली आहे. आयसीसीनेदेखील अशा प्रस्तावांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
फिरोजशाह कोटला मैदानावर मास्क घालून उतरलेल्या श्रीलंका संघाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून, जगभरात पोहोचला आहे. भारतातील हवा प्रदूषणाचा मुद्दा यानिमित्ताने उचलला गेला असून, सगळीकडे याबद्दल चर्चा सुरु आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा संघ मास्क घालून मैदानावर उतरला होता. तसंच खेळण्यात प्रदूषणामुळे अडथळा येण्याचीही ही पहिलीच वेळ होती.
असांका गुरुसिन्हा यांचं म्हणणं आहे की, आमचे खेळाडू इतकी खराब हवा सहन करु शकत नाहीत. फलंदाजांना त्रास होतोय की नाही हे सांगणं कठीण आहे, पण आमचे गोलंदाज संघर्ष करत आहेत. आम्ही अशा देशातून आलो आहोत जिथे जास्त प्रदूषण नाही. दिल्लीमधील अमेरिकी दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राजधानीमधील एअक क्वालिटी इंडेक्स 398 होता, जो गरजेपेक्षा 15 टक्के जास्त आहे.