आपल्या पिढीतील महान खेळाडूंपैकी एक, आर अश्विनने ( R Ashwin) कसोटी क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्याने फिरकीवर अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले आहे आणि यशाचे एकेक शिखर तो सर करत गेला आहे. पण, तरीही भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातील त्याचे स्थान कधीच कायम राहिलेले नाही. वन डे व ट्वेंटी-२० संघातील त्याची कामगिरी फार चांगली नव्हती, तरीही तो काही वर्ल्ड कप खेळला. पण, आता वन डे व ट्वेंटी-२० संघात स्थान त्याचे स्थान असायलाच नको, असे स्पष्ट मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याने व्यक्त केले.
टाइम्स ऑफ इंडियाशी गप्पा मारताना युवराजने लाल चेंडूचा क्रिकेटपटू म्हणून अश्विन किती चांगला आहे हे सांगितले, परंतु मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळाडूकडून काय अपेक्षा आहे हे सांगता येत नाही. अश्विन हा उत्तम गोलंदाज आहे, पण फलंदाजीत त्याच्याकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फारसे योगदान मिळत नसल्याचे युवी म्हणाला. "अश्विन एक महान गोलंदाज आहे, पण वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तो स्थान मिळवण्यास पात्र नाही, असे मला वाटते. तो गोलंदाजीत खूप चांगला आहे, पण फलंदाजीचं काय? किंवा क्षेत्ररक्षक म्हणून काय योगदान? कसोटी संघात तो असायला हवा. पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो जागा घेण्यास पात्र आहे असे मला वाटत नाही," असे युवराज म्हणाला.
अश्विनने ९५ कसोटी सामन्यांत ४९० विकेट्स घेतल्या आहेत. वन डे ( ११६) व ट्वेंटी-२० ( ६५) त्याच्या नावावर अनुक्रमे १५६ व ७२ विकेट्स आहेत. कसोटीत त्याने ५ शतकं व १४ अर्धशतकांसह ३१९३ धावाही केल्या आहेत. वन डेमध्ये ७०७ व ट्वेंटी-२०त १८४ धावा त्याच्या नावावर आहेत.
युवराज आणि अश्विन हे २०११ मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्हिडिओमध्ये खुलासा केला होता की त्याला कॅन्सर झाल्याचे कळल्यावर त्याला किती धक्का बसला होता. "युवीला खोकला यायचा आणि तो जोरात खोकायचा. मला वाटायचे की हे खेळाचे प्रेशर आहे. अक्षरशः कुणालाही कल्पना नव्हती, तो गंभीर आजाराने ग्रस्त होता. युवीला कॅन्सर झाल्याची बातमी आली, तेव्हा मला धक्काच बसला,” असे अश्विन म्हणाला होती.