दुबई : आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारताचा सलामीवीर लोकेश राहुलची घसरण झाली असून तो आता सहाव्या स्थानी आला आहे. तसेच, माजी कर्णधार विराट कोहलीने आपले आठवे स्थान कायम राखले आहे. फलंदाजांमध्ये अव्वल दहा स्थानांमध्ये इतर कोणत्याही भारतीयाचा समावेश नाही.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत अखेरच्या तीन सामन्यांत अर्धशतकी खेळीनंतर राहुलचे ७२७ गुण झाले असून तो एका स्थानाने घसरला आहे. या स्पर्धेनंतर भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्त्व सोडलेल्या कोहलीचे ६९८ गुण असून तो आठव्या स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या मिशेल मार्शने सहा स्थानांची प्रगती करत १३ वे स्थान मिळवले असून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला डेव्हिड वॉर्नर ३३ व्या स्थानी आला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम (८३९) आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान (८०५) अनुक्रमे पहिल्या दोन स्थानी आहेत.
लंकेचा हसरंगा अव्वलगोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर ॲडम झम्पा तिसऱ्या स्थानी, तर जोश हेझलवूड सहाव्या स्थानी आहेत. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा ७९७ गुणांसह, तर दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी ७८४ गुणांसह अनुक्रमे अव्वल व द्वितीय आहेत. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले.