आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चाचा विषय ठरत आहे. गेल्या एका आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दोन मोठे धक्के बसले आहेत. पाकिस्तानात दाखल झालेल्या न्यूझीलंडच्या क्रिकेट संघानं ऐनवेळी दौऱ्यातून माघार घेतली. त्यानंतर सोमवारी इंग्लंडनंही आपला नियोजित पाकिस्तान दौरा रद्द करत असल्याची घोषणा केली. याच मुद्द्यावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
इंग्लंडनं पाक दौरा रद्द केल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला असून यात इंग्लंड आणि न्यूझीलंडवर जोरदार टीका केली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या निर्णयाचा पाकिस्तान लवकरच बदला घेईल, असं रोखठोक विधान रमीज राजा यांनी केलं आहे.
पीसीबीनं ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रमीज राजा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "मी इंग्लंडच्या निर्णयानं खूप निराश झालो. पण या निर्णयाची अपेक्षा होतीच. कारण अशावेळी पाश्चिमात्य देश एकजुट होतात आणि एकमेकांचं समर्थन करत सुटतात. सुरक्षेचं कारण देत तडकाफडकी कोणतेही निर्णय घेतले जातात आणि याची साधी कल्पना देखील तुम्हाला दिली जात नाही. न्यूझीलंडनं तर कोणतीही कल्पना न देता ऐनवेळी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. आता इंग्लंडकडूनही असाच काहीचा निर्णय होणं अपेक्षित होतं. खरंतर हा एक मोठा धडा आता मिळाला आहे.या देशांच्या दौऱ्यावर जेव्हा कुणी जातं तेव्हा कडक निर्बंध आणि क्वारंटाइनचं पालन करावं लागतं. पण जेव्हा ते इथं येतात तेव्हा त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या लागतात", असं रमीज राजा म्हणाले.
पाकिस्तान लवकरच बदला घेणार"आम्ही आता वर्ल्डकप स्पर्धेत या सगळ्याचा बदला घेऊ. याआधी फक्त एकच संघ आमचा शत्रु होता. पण आता त्यात न्यूझीलंड आणि इंग्लंडचाही समावेश झाला आहे. कारण तुम्ही आमच्यासोबत बरोबर वागला नाहीत आणि याचा बदला आम्ही मैदानात नक्कीच घेऊ", असं रमीज राजा म्हणाले.