मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना बदली खेळाडू म्हणून संघात विजय शंकर आणि शुबमन गिल यांना संधी दिली. शंकरचा वन डे संघातील सहभाग अपेक्षित होता, परंतु शुबमनच्या निवडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 2018-19च्या हंगामात त्याने भारताच्या A संघाचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु म्हणून त्याला वरिष्ठ संघात संधी मिळेल, असे कुणालाही वाटले नव्हते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पण गाजवणारा मयांक अग्रवालच्या नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र, मयांक दुखापतग्रस्त असल्याने शुबमनला राष्ट्रीय संघात संधी मिळाली. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करू शकणार नाह. या दुखापतीमुळेच वन डे आणि ट्वेंटी-20 संघात पदार्पणाची त्याची संधी हुकली.
निवड समितीने मनिष पांडे किंवा श्रेयस अय्यर यांना संधी देण्याएवजी शुबमनचे नाव आघाडीवर ठेवले. पांडे व अय्यर हे दोघेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संघाचे सदस्य होते. मात्र, त्यांना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यात संधी मिळवता आली नाही. शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नसून तो थेट न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहे. 19 वर्षीय शुबमनचा हा वर्षभरातील तिसरा न्यूझीलंड दौरा आहे. शंकर सोमवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ऑल राऊंडर असल्यामुळे मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.