मुंबई : बीसीसीआयमध्ये सध्या दोन पदांसाठी भरती आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली असून २४ जानेवारीपर्यंत इच्छूक व्यक्तींकडून अर्ज मागवले आहेत. या दोन्ही पदांसाठी गलेलठ्ठ पगारही देण्यात येणार आहे.
बीसीसीआयमध्ये कोणत्याही पदसाठी भरती असेल, तर त्यासाठी सुलभ प्रक्रीया राबवली जाते. याबाबतची माहिती बीसीसीआयकडून देण्यात येते आणि इच्छूकांकडून अर्ज मागवले जातात. त्यानुसार बीसीसीआयने यावेळीही दोन पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत. आता तुम्हि विचार करत असाल की, बीसीसीआयमध्ये नेमक्या कोणत्या दोन पदांसाठी भरती सुरु आहे...
बीसीसीआयची ही भरती निवड समितीसाठी आहे. कारण निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि निवड समिती सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या दोन पदांसाठी बीसीसीआयने २४ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत.
निवड समिती सदस्यांसाठी काही अटीही यावेळी ठेवण्यात आल्या आहेत. अर्जदाराचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असू नये, ही पहिली अट आहे. त्याचबरोबर अर्जदाराने २० कसोटी आणि ३० प्रथम श्रेणी सामने किंवा १० एकदिवसीय आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.