सिडनी : चेंडूशी छेडछाड केल्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ही टीकेचे धनी ठरत आहेत. आपली चूक मान्य करताना या दोघांनी अश्रू ढाळले, त्यानंतर मात्र त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली गेली. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. कारण त्यांची शिक्षा आता कमी करण्याचा विचार ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ करत आहे.
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा रणनितीचाच असल्याचे मान्य केले. त्यानंतर या साऱ्या प्रकाराचा सूत्रधार वॉर्नर असल्याचे पुढे आले आणि त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यासहीत स्मिथवर एका वर्षाची बंदी घातली. त्यानंतर बीसीसीआयनेही त्याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवला.
यावेळी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ग्रेग डायर यांनी सांगितले की, " काही वेळा एखादा निर्णय घेताना घाई होते. त्यामुळे काही निर्णय अधिक कठोरपणे घेतले जातात. स्मिथ आणि वॉर्नर यांना केलेली शिक्षा जास्त आहे. या दोघांनी आपली चूक मान्य केली आहे आणि त्यांना आपल्या कृत्याचा पश्चातापही आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा कमी होऊ शकते. "
स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली आहे. या बंदीविरोधात हे दोघेही 11 एप्रिलपर्यंत दाद मागू शकतात. त्यामुळे जर स्मिथ आणि वॉर्नर हे आपली बाजू मांडण्यात यशस्वी झाले तर त्यांची शिक्षा कमी होऊ शकते.