चेन्नई : पहिल्या कसोटीत तब्बल २२७ धावांनी झालेल्या अनपेक्षित पराभवाचा वचपा काढताना भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा तब्बल ३१७ धावांनी धुव्वा उडवत भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही दुसरे स्थान मिळवत अंतिम सामन्यातील आशा जिवंत ठेवल्या.भारताच्या ४८२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १६४ धावांमध्ये संपुष्टात आला. आर. अश्विनची निर्णायक अष्टपैलू खेळी, रोहित शर्माचे खणखणीत दीडशतक आणि अक्षर पटेलने घेतलेले पाच बळी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्ध किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. जूनमध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडने आधीच स्थान निश्चित केले आहे.
सामन्यात इंग्लंडकडून कोणीही अर्धशतक झळकावू शकले नाही.१९९५ सालानंतर पहिल्यांदाच इंग्लंडची दोन्ही डावातील एकूण धावसंख्या तीनशेपार गेली नाही. कसोटी सामन्यात शतक आणि ८ बळी अशी कामगिरी करणारा अश्विन एकमेव भारतीय असून त्याने दुसऱ्यांदा असा पराक्रम केला आहे. घरच्या मैदानावर सर्वाधिक २१ कसोटी सामने जिंकण्याच्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी केली कोहलीने बरोबरी. धावांच्या तुलनेत भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय.
- अक्षर पटेलने स्वप्नवत पदार्पण करताना दुसऱ्या डावात ६० धावा देत ५ बळी घेतले आणि इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. कसोटी पदार्पणात ५ बळी घेणारा अक्षर नववा भारतीय ठरला.
- पहिल्या डावात पाच बळी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात शतक ठोकत निर्णायक अष्टपैलू खेळ केलेला अश्विन सामनावीर ठरला.
आम्ही फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी केली. फिरकी आणि उसळी पाहून घाबरलो नाही. आम्ही जिद्द दाखवली आणि सामन्यात ६००हून अधिक धावा केल्या.- विराट कोहली, कर्णधार
भारताने तिन्ही विभागात आम्हाला नमवले. हा पराभव आमच्यासाठी मोठा धडा आहे. या पराभवातून शिकून आम्हाला धावा काढण्याचा मार्ग शोधावा लागेल.- ज्यो रुट, कर्णधार