ठळक मुद्देऑस्ट्रेलियात ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा वर्ल्ड कपपूर्वी समतोल संघ निवडण्यासाठी चाचपणी सुरू
मुंबई : ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. मे-जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम संघ निवडीसाठी भारतीय संघाकडे दहाच सामन्यांचा पर्याय आहे. भारतीय संघाला अजूनही सलामीवीरांच्या अपयशावर तोडगा काढता आलेला नाही. मात्र, हा प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दोन खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे धवनला पर्याय म्हणून यष्टिरक्षक रिषभ पंतच्या नावाचा विचार केला जात आहे, तर मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत. पंतने आतापर्यंत तीन वन डे सामन्यांत केवळ 41 धावा केल्या आहेत. तो मधल्या फळीला फलंदाजीला येतो, परंतु धवनच्या अपयशामुळे त्याला सलामीला संधी मिळू शकते. रहाणे 16 फेब्रुवारी 2018 नंतर वन डे सामना खेळलेला नाही.
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबतचे चित्र स्पष्ट नाही. धवनची सध्याची कामगिरी आणि रायुडूचे अपयश यामुळे पंतला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. टाइम्प ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारत A संघाच्या इंग्लंड लायन्सविरुद्धच्या वन डे मालिकेत पंतला आघाडीला फलंदाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन वन डे सामन्यांसाठी पंतचा भारत A संघात समावेश करण्यात आला आहे.
रहाणे भारत A संघाचे नेतृत्व करणार आहे आणि त्याच्या कामगिरीवर निवड समितीची नजर राहणार आहे. या मालिकेत रहाणे पाचही सामने खेळणार आहे, तर न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी पंत दोन वन डे सामने खेळणार आहे. ''पंतला आघाडीला फलंदाजी करून नवीन चेंडूचा सामना करण्याच्या सूचना नुकत्याच संघ व्यवस्थापनाने केल्या आहेत. गरज पडल्यास पंतचा राखीव सलामीवीर म्हणून विचार केला जाऊ शकतो. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर निवड समितीला बॅक अप प्लान तयार ठेवायचा आहे,''असे सूत्रांनी टाइम्प ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
दरम्यान, धवन आणि रायुडू यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत अनुक्रमे 55 व 24 धावा करता आल्या आहेत. या मालिकेत 193 धावा करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीसह, केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांनीही मधल्या फळीत चोख कामगिरी बजावली आहे. त्यामुळे निवड समिती आघाडीची फलंदाजी मजबूत करण्याच्या मागे लागली आहे.
Web Title: Rishabh Pant, Ajinkya Rahane in contention for top order spots at 2019 World Cup, Source
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.