नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या उपकर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजी शैलीनुरूप असल्याने नव्या चेंडूचा सामना करताना पुनरागमनात सिडनी कसोटीत शतकी खेळीची अपेक्षा करता येईल, असे माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने म्हटले आहे.
आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे, टी-२० आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यास मुकला होता. सिडनीत गुरुवारी सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीत रोहितला मयांक अग्रवालच्या जागी संघात स्थान मिळणे अपेक्षित आहे. अग्रवाल आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यात फारच फ्लॉप ठरला. त्याने १७, ९, ०० आणि ५ अशा धावा केल्या.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात लक्ष्मण म्हणाला, ‘रोहितच्या पुनरागमनामुळे संघात चैतन्य संचारले आहे. विराटच्या अनुपस्थितीत संघात अधिक अनुभवी खेळाडूंची गरज आहे. सिडनीत जिंकून २-१ अशी आघाडी घेतल्यास मालिका ३-१ अशी जिंकण्याची अधिक संधी असेल. रोहितची फलंदाजी शैली ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीला अनुकूल असल्याने तो नव्या चेंडूचा यशस्वी सामना करीत तो खेळपट्टीवर स्थिरावल्यास मोठी खेळी करू शकतो, असे माझे मत आहे.’ रोहितने २०१३ ला कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत तो केवळ ३२ कसोटी सामने खेळू शकला.