भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने ( Virender Sehwag) याने भारतीय संघ व्यवस्थापनाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ३५ वर्षीय रोहित शर्मा ( Rohit sharma) तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. त्यामुळेच वर्कलोड कमी करण्यासाठी रोहित शर्माला ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, असा सल्ला वीरूने दिला आहे. मागील वर्षी विराट कोहलीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहितकडे ही जबाबदारी सोपवली गेली. वन डे व कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विराटने हा निर्णय घेतला होता. पण, रोहितकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवल्यानंतर BCCI ने कोहलीची वन डे कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आणि त्यानंतर कोहलीने कसोटीचेही कर्णधारपद सोडले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुखापतीमुळे रोहित शर्माला विश्रांती दिली गेली होती आणि लोकेश राहुलने वन डे संघाचे नेतृत्व सांभाळले होते. मागील आठवड्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-२ अशी बरोबरी मिळवली. सध्या हार्दिक पांड्या आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे कर्णधारपद पाहतोय. ''भारताच्या तीनही संघासाठी एक कर्णधार, या पॉलिसीवर बीसीसीआय ठाम असेल तर रोहित हा सक्षम पर्याय आहे,'' असेही वीरूने स्पष्ट केले.
''ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी संघ व्यवस्थापनाच्या डोक्यात दुसऱ्या खेळाडूचा विचार असेल तर त्यांनी लगेच रोहित शर्माला या जबाबदारीतून मुक्त करावे. त्याने रोहितला त्याचा वर्कलोडही सांभाळता येईल आणि मानसिक थकवाही होणार नाही. तो वन डे व कसोटीवर अधिक लक्ष केंद्रीत करू शकेल,''असे मत वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले.