गुवाहाटी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने नाबाद 152 धावांची दमदार खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर रोहित हा एक विश्वविक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचताना रोहितने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही पिछाडीवर टाकले आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारतापुढे 323 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान 43व्या षटकात आठ विकेट्स राखून पूर्ण केले. या सामन्यात रोहितने 117 चेंडूंत 15 चौकार आणि आठ षटकाराच्या जोरावर नाबाद 152 धावा केल्या होत्या.
रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके आहेत. तीन द्विशतके झळकावणारा तो क्रिकेट विश्वातील एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150पेक्षा जास्त धावा करणारा रोहित हा अव्वल खेळाडू ठरला आहे. कारण एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150पेक्षा जास्त धावा रोहितने तब्बल सहा वेळा केल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम यापूर्वी सचिन आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर संयुक्तरीत्या होता. या दोघांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150पेक्षा जास्त धावा प्रत्येकी पाच वेळा केल्या होत्या. रोहितने त्यांचा हा विक्रम मोडीत काढला आहे.