दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा आज ४८वा वाढदिवस... त्यानं वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला असून इतरांनाही त्यानं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर सचिनवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सर्व चाहत्यांचे सचिननं एक खास व्हिडीओ पोस्ट करून आभार मानले. त्यानं म्हटले की,''मला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. तुमच्या शुभेच्छांनी माझा आजचा दिवस आणखी खास केला.'' सचिननं नुकतीच कोरोनावर मात केली आणि या व्हिडीओत त्यानं त्याचाही उल्लेख केला. तो म्हणाला,''मागील महिना माझ्यासाठी खडतर होता. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मी २१ दिवस आयसोलेट झालो.''
''तुमच्या प्रार्थना व शुभेच्छा, माझ्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या प्रार्थना व शुभेच्छा आणि डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ... त्यांनी माझ्यात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आणि मला बरं केलं. या सर्वांचे खूप खूप आभार,''असेही सचिन या व्हिडीओत म्हणाला आहे.
या व्हिडीओत सचिननं त्याचा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आणि इतरांनाही त्यानं आवाहन केलं. मागच्या वर्षी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये सचिनच्याच हस्ते प्लाझ्मा डोनेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. ज्यांनी कोरोनावर मात केलीय त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा हा सक्रिय रुग्णांना बरं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. ''योग्यवेळी प्लाझ्मा दिला गेला, तर रुग्ण लवकर बरा होतो,''असे सचिन म्हणाला आणि त्यानंही प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.
पाहा सचिन तेंडुलकर काय म्हणाला...