Join us  

सगुणची शतकी झुंज; थरारक लढतीत गोव्याची गुजरातवर मात

कर्णधार सगुण कामतच्या नाबाद शतकाच्या जोरावर गोव्याने गुजरातवर एक गडी राखून विजय नोंदवला. याबरोबरच गोव्याने विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट चषक स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला. सगुण कामतचे हे यंदाच्या स्पर्धेतील पहिले शतक ठरले. त्याने १४८ चेंडूंचा सामना करीत १४ चौकार आणि एका षटकराच्या मदतीने ११० धावांची खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 8:51 PM

Open in App

 पणजी - कर्णधार सगुण कामतच्या नाबाद शतकाच्या जोरावर गोव्याने गुजरातवर एक गडी राखून विजय नोंदवला. याबरोबरच गोव्याने विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट चषक स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला. सगुण कामतचे हे यंदाच्या स्पर्धेतील पहिले शतक ठरले. त्याने १४८ चेंडूंचा सामना करीत १४ चौकार आणि एका षटकराच्या मदतीने ११० धावांची खेळी केली. गोव्याने ४८.३ षटकांत ९ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. उल्लेखनीय म्हणजे, सगुणशिवाय गोव्याच्या एकही फलंदाजाला ३० धावसंख्येपेक्षा अधिक धावा करता आल्या नाही. त्यामुळे सगुणची खेळी मॅचविनिंग ठरली. 

हा सामना चेन्नई एसएसएन महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आला. सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरला. गुजरातने ४९.४ षटकांत २२७ धावा केल्या. यामध्ये भार्गव मेराई याने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली. कर्णधार व सलामीवीर पार्थिव पटेल याला अवघ्या ८ धावांवर लक्ष्य गर्गने बाद केले. त्यानंतर के. पांचाल (२६) आणि ध्रुव रावळ (१०) हे सुद्धा मोठी खेळी करु शकले नाही. मेराई आणि काथन पटेल यांनी गुजरातचा डाव पुढे नेला. अमोघ देसाईने काथनला बाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर गुजरातचा आर. भट्ट (७) आणि पीयूष चावला (७) यांना अनुक्रमे दर्शन मिशाळ आणि विजेश प्रभुदेसाई यांनी तंबूत पाठवले. एस. शिंदे या धावांसाठी संघर्ष केला. त्याने २७ धावा फटकारल्या. त्याला दर्शनने किननकरवी झेलबाद केले. मेराईच्या एकाकी झुंजीमुळे गुजरातने २२७ धावसंख्येपर्यंत मजल मारली. गोव्याच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यांनी गुजरातच्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळवले. दर्शन मिशाळने सर्वाधिक ३, अमोघ देसाई, विजेश प्रभुदेसाई आणि अमूल्य पांढ्रेकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 

प्रत्युत्तरात, अमोघ देसाई (१०) आणि स्वप्नील अस्नोडकर (२५) आणि स्नेहल कवठणकर (२८) हे आघाडीचे फलंदाज मोठी धावसंख्या करु शकले नाही. गोवा संघ ३० व्या षटकांत ३ बाद १४६ अशा स्थितीत होता. एका बाजूने खेळणाºया सगुण कामत याच्यावर सर्व जबाबदारी होती. त्याने कर्णधारपदाला साजेशा खेळ केला. दुसºया बाजूने मात्र गोव्याचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत होते. त्यामुळे सगुणवर दबाव वाढत होता. अशा स्थितीत सगुणने आपले शतक पूर्ण केले. त्याने १४८ चेंडूंत ११० धावांची शानदार खेळी केली. तळात अमूल्य पांढ्ररेकरने १३ आणि गणेश नार्वेकरने ११ धावांचे योगदान दिले. गुजरातकडून पीयुष चावला आणि काथन पटेल यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. 

 

गणेशराज नार्वेकरचे पुनरागमन

गेल्या वर्षभरापासून मैदानाबाहेर राहिलेल्या गणेशराज दयानंद नार्वेकर याने आज विजय हजारे क्रिकेट चषकातील पहिला सामना खेळला. गणेशराज हा जीसीएचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी रणजी क्रिकेट स्पर्धेत गणेशराज खेळला होता. यावर्षी मात्र त्याला संधी मिळाली नव्हती. बुधवारच्या सामन्यात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी केली. गोलंदाजीत तो यशस्वी ठरला नाही पण फलंदाजातील त्याच्या ११ धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. 

संक्षिप्त धावफलक : गुजरात ४९.४ षटकांत सर्व बाद २२७, भार्गव मेराई ९३, संतोष शिंदे २७, प्रियांक पांचाल २६, दर्शन मिशाळ १0-१-३६-३, अमोघ देसाई १0-0-२८-२, गोवा ४८.३ षटकांत ९ बाद २२८, सगुण कामत नाबाद ११0, स्रेहल कवठणकर २८, स्वप्निल अस्रोडकर २५, पियुष चावला १0-३-२७-३, कथन पटेल ९-0-४२-३, सिद्धार्थ देसाई १0-0-२६-१.

टॅग्स :क्रिकेटगोवा