ठळक मुद्देकुरेनने घरच्या मैदानावर खेळताना पहिल्या नऊ चेंडूंमध्येच तीन बळी घेत लंकेची ४ बाद २१ धावा अशी केविलवाणी अवस्था केली होती.
लंडन : युवा अष्टपैलू सॅम कुरेनची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर जो रुट व कर्णधार इयॉन मॉर्गन यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाजी मारली. यासह इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २४१ धावांत रोखल्यानंतर इंग्लंडने ४३ षटकांमध्येच २ बाद २४४ धावा करत ८ गड्यांनी दणदणीत विजय मिळविला.
केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो कुरेन. त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम मारा करताना ४८ धावांत ५ बळी घेतले. त्याच्यासोबत नव्या चेंडूने मारा केलेल्या डेव्हिड विली यानेही ४ बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. धनंजय डीसिल्वा (९१) आणि दासुन शनाका (४७) यांच्यामुळे श्रीलंकेला समाधानकारक धावा उभारता आल्या.
कुरेनने घरच्या मैदानावर खेळताना पहिल्या नऊ चेंडूंमध्येच तीन बळी घेत लंकेची ४ बाद २१ धावा अशी केविलवाणी अवस्था केली होती.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २४१ धावा (धनंजय डीसिल्वा ९१, दासुन शनाका ४७, वानिंदू हसरंगा २६; सॅम कुरेन ५/४८, डेव्हीड विली ४/६४.) पराभूत वि. इंग्लंड : ४३ षटकांत २ बाद २४४ धावा (इयॉन मॉर्गन नाबाद ७५, जो रुट नाबाद ६८, जेसन रॉय ६०; चमिका करुणारत्ने १/३४, वानिंदू हसरंगा १/४६.)
श्रीलंकेने गमावले सर्वाधिक वन डे
लंकेने इंग्लंडविरुद्ध काल दुसरा वन डे आठ गड्यांनी गमावताच वन डे क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंका संघाने सर्वाधिक ४२८ सामने गमावण्याचा नकोसा विक्रम केला. या संघाने आतापर्यंत जे ८६० सामने खेळले. त्यापैकी केवळ ३९० सामने जिंकले आहेत. भारताने ९९३ पैकी ४२७ सामने गमावले असून पाकिस्तान संघाने ४१४ सामने गमावले.
Web Title: Sam Curran's penetrating bowling
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.