मुंबई, सध्या आयपीएलचा ज्वर चढलेला आहे. आयपीएलच्या बाद फेरीत कोणता संघ जाईल, या गोष्टींच्या चर्चा रंगत आहेत. याबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त केले. याविषयी बोलताना, 'धोनी भारतापेक्षा आयपीएमध्ये खेळताना प्रभावी वाटतो', असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्याबरोबर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायला आवडले असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मांजरेकर म्हणाले की, " धोनीचे कर्णधारपद आणि फलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलमध्ये जास्त प्रभावी दिसतं. मुंबई इंडियन्सलाही जिंकण्याची संधी आहे. पण त्यांनी संघात काही बदल करावे लागतील. त्यामुळे हैदराबादचा संघ मला जास्त आवडतो. कारण त्यांच्याकडे स्पेशालिस्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत.''
आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघातून खेळायला आवडले असतेआयपीएलमधून मला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायला आवडलं असतं, त्याचबरोबर राजस्थानकडून मला खेळायला आवडलं असतं. कारण राजस्थानकडून खेळणं जास्त आव्हानात्मक आहे. मोठे खेळाडू संघात घेऊन जिंकणं सोपं असतं. पण नावाजलेले नसलेले खेळाडू घेऊन जिंकणं आव्हानात्मक असतं. राजस्थानकडून मला कर्णधारपद भूषवणं आवडलं असतं.
आयपीएलमुळे फलंदाजीचे तंत्र बिघडलेआयपीएलमुळे फलंदाजीचे तंत्र थोडेसे बिघडले आहे. जास्तकरून बचावात्मक फलंदाजी पाहताना हे प्रकर्षाने जाणवतं. सर्व जगभरात हे झालं आहे. चेंडू स्विंग व्हायला लागला की फलंदाज अडचणीत आल्यासारखे वाटतात. सध्याच्या घडीला कसोटी सामने जास्त निकाली लागताना पाहयला मिळत आहेत. त्यामुळे चेतेश्वर पुजारासारखा खेळाडू सर्वांनाच हवाहवासा वाटतो. कसोटी क्रिकेट ज्यांना आवडतं ते बचावावर जास्त लक्ष देतील. लोकांनी क्रिकेट पाहावं, असंही बऱ्याच जणांना वाटतं. त्यामुळे आजची पिढी ही बचाव पाहायला स्टेडियममध्ये जाणार नाही. मला कसोटी आणि ट्वेन्टी-20 क्रिकेट आवडतं, पण एकदिवसीय क्रिकेट आवडतं नाही.