रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तिसऱ्या लढतीपूर्वी भारतीय खेळाडूंनी आपल्या सामन्याचे सर्व शुल्क राष्ट्रीय संरक्षण निधीला दिले. त्याचबरोबर टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्सही परीधान केल्या. हीच गोष्ट समालोचकांनीही केल्याचे पाहायला मिळाले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्याहस्ते भारताच्या समालोचकांना आर्मीच्या कॅप्स प्रदान करण्यात आल्या. गावस्कर यांनी लक्ष्मण शिवराकृष्णन, मांजरेकर, हर्षा भोगले आणि मुरली कार्तिक यांना आर्मीच्या कॅप्स दिल्या. त्यानंतर मांजरेकर यांनी गावस्करांना आर्मीची कॅप दिली आणि सर्वांसमोर त्यांच्या पाया पडला.
How's The Josh... धोनीने सामन्यापूर्वी टीम इंडियाला दिल्या आर्मीच्या कॅप्स
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारीला हल्ला केला, त्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले. या शहीद जवानांना सॅल्यूट करण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या. धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. केदार जाधवने ही कॅप घेताना लष्करातील जवानांप्रमाणे कडकडीत सॅल्यूट केला.त्याचबरोबर या सामन्याचे शुल्क सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय संरक्षण निधीला देण्याचे ठरवले आहे.
रांची हे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे शहर. त्यामुळे सामन्यापूर्वी धोनीने भारताच्या आर्मीच्या कॅप्स टीम इंडियाला दिल्या. त्याचबरोबर देशवासियांनी राष्ट्रीय संरक्षण निधीला सढळ हस्ते मदत करावी, जेणेकरून शहीद जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल, असा संदेशही यावेळी देण्यात आला आहे.
नाणेफेकीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हीच आर्मी कॅप घालून आला होता. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आर्मीच्या कॅप्स घातल्यानंतर आपल्या भावनाही व्यक्त केल्या. कोहली यावेळी म्हणाला की, " दहशतवादी हल्ल्यात जे भारतीय जवान शहीद झाले त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्यासाठी आम्ही आज आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या आहेत. त्याचबरोबर आजच्या सामन्याचे सर्व शुल्क आम्ही राष्ट्रीय संरक्षण निधीला देण्याचे ठरवले आहे. देशवासियांनीही या निधीला सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन मी करत आहे. कारण या निधीचा फायदा शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे."
यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी २० सामन्यात भारतीय खेळाडूंनी काळ्या फिती बांधून व मैदानावर मौन पळून शहीदांना श्रद्धांजली वाहिली होती.
भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. आता तिसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. रांचीला ओळख मिळवून दिली ती महेंद्रसिंग धोनीने.कारण या लहान शहरातून आलेला तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाला.
Web Title: Sanjay Manjrekar takes blessing from Sunil Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.