नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजले आहे. सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८ संघामध्ये लढत पार पडली. आज झालेल्या दोन्ही सामन्यांमुळे सुपर-१२ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. राउंड फेरीमध्ये खेळलेल्या आठ संघांपैकी श्रीलंका, नेदरलॅंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या ४ संघाना विश्वचषकाचे तिकिट मिळाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने स्कॉटलंडचा पराभव केला. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी भारतीय संघाचा सामना झिम्बाब्वेविरूद्ध होईल.
झिम्बाब्वेने ५ गडी राखून मिळवला विजयतत्पुर्वी, स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना संघाला साजेशी खेळी करण्यात अपयश आले. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुनसे व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुनसेने ५१ चेंडूत ५४ धावांची सावध खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर स्कॉटलंडच्या संघाने २० षटकांत ६ बाद १३२ धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने ५ गडी राखून विजय मिळवला आणि विश्वचषकाचे तिकिट मिळवले. झिम्बाब्वेने घातक गोलंदाजीचा मारा करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. झिम्बाब्वेकडून तेंडाई चतारा आणि रिचर्ड नागरावा यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले. तर ब्लेसिंग मुजरबानी आणि सिकंदर रझा यांना १-१ बळी घेण्यात यश आले.
स्कॉटलंडने दिलेल्या १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने सावध खेळी केली. सलामीवीर क्रेग एर्विन अर्धशतकी खेळी करून बाद झाला. अखेरच्या काही षटकांमध्ये सिकंदर रझाने २३ चेंडूत ४० धावांची ताबडतोब खेळी करून झिम्बाब्वेला विजयाच्या जवळ पोहचवले. अखेर झिम्बाब्वेने १८.३ षटकांत ५ बाद १३३ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला. स्कॉटलंडकडून जोश डेव्हीने २ बळी पटकावले. तर मार्क वॅट आणि मायकेल लीस्क यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. त्यामुळे आता झिम्बाब्वे विरूद्ध भारत असा सामना ६ नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे.
ग्रुप ए मधील संघ -इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका, आयर्लंड.
ग्रुप बी मधील संघ - भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलॅंड, झिम्बाब्वे.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न२७ ऑक्टोबर - भारत वि. नेदरलॅंड, १२.३० वाजल्यापासून, सिडनी३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून, पर्थ२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, १.३० वाजल्यापासून, ॲडलेड६ नोव्हेंबर - भारत वि. झिम्बाब्वे, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"