लखनऊ : मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आपल्या अद्वितीय कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले. रणजी स्पर्धेच्या गेल्या मोसमात पदार्पणामध्ये शतक झळकावलेल्या १७ वर्षीय पृथ्वीने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम केला. इंडिया रेड संघाकडून खेळताना पृथ्वीने दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणार सर्वात युवा फलंदाज म्हणून विक्रम रचला.
लखनऊमध्ये सुरु असलेल्या दिवस-रात्र अंतिम सामन्यात इंडिया ब्ल्यू संघाविरुध्द पृथ्वीने शानदार शतक झळकावले. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंडिया रेड संघाने ८९ धावांवर २ बळी गमावले होते. परंतु, यानंतर पृथ्वीने कर्णधार कार्तिकसह संघाला सावरताना जबरदस्त शतकी तडाखा दिला. या दोघांनी महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी करुन संघाला सावरले. पृथ्वीने २४९ चेंडूत १५४ धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये त्याने १८ चौकार व एक षटकार मारला. कार्तिकने १५५ चेंडूत १२ चौकारांसह १११ धावांची खेळी केली. दोघांनी तिसºया विकेटसाठी २११ धावांची मजबूत भागीदारी केली. अक्षय वखारेने कार्तिकला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर पृथ्वीही बाद झाला. पाठोपाठ बाबा इंद्रजीत (४) परतल्याने रेड संघाचा डाव पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३१७ धावांवर थांबला. भार्गव भट्ट याने (३/८३) चांगला मारा केला.
याआधी पृथ्वीने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने इंग्लंड ‘अ’ विरुध्द ६२.५० च्या सरासरीने सर्वाधिक २५० धावा केल्या. २०१३ साली मुंबई शालेय हॅरीश शिल्डमध्ये रिझवी स्प्रिंगफील्डकडून खेळताना पृथ्वीने ३३० चेंडूत ५४६ धावांचा तडाखा दिला होता.
‘मास्टर’ मार्गावर वाटचाल...
पृथ्वीच्या खेळीची कायम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी तुलना होते. याला कारणही तसेच आहे. ज्यावेळी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्याच्या चार दिवसांनीच पृथ्वीने शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर गेल्याचवर्षी त्याने रणजी पदार्पण करताना सचिनप्रमाणेच पहिल्या सामन्यात शतक झळकावले. सचिननेही आपल्या कारकिर्दीमध्ये रणजी, दुलीप आणि इराणी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणातच शतक झळकावले होते. त्यामुळेच, आता पृथ्वीचे लक्ष पुढील इराणी ट्रॉफीवर असेल.
Web Title: Second to Sachin! 17-year-old Mumbai's debut century in debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.