पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं ४०व्या वर्षीही तुफान फटकेबाजी करताना क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. लंका प्रीमिअर लीगमध्ये गॅल ग्लॅडिएटर संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या आफ्रिदीनं २० चेंडूंत अर्धशतक झळकावून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला, परंतु जाफ्ना स्टॅलिअन्सच्या विआ फर्नांडोच्या तुफानी खेळीनं आफ्रिदीच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. जाफ्ना संघानं ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
हंम्बाटोंटाच्या मोठ्या ग्राऊंडवर षटकार मारणे म्हणजे मोठं आव्हानच... त्यातही आफ्रिदीनं लंका प्रीमिअर लीगमधील त्याच्या पहिल्याच सामन्यात दमदार खेळ केला. त्यानं २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आफ्रिदीनं ३ चौकार व ६ षटकारांच्या मदतीनं २३ चेंडूंत ५८ धावा केल्या. गुणथिलका ( ३८) आणि पी राजपक्षा ( २१) यांनी त्याला साथ देताना ग्लॅडिएटर संघाला ८ बाद १७५ धावा करून दिल्या. १५ षटकांत ग्लॅडिएटरच्या ९८ धावाच होत्या. आफ्रिदीच्या वादळी खेळीच्या जोरावर संघानं अखेरच्या पाच षटकांत ७७ धावा चोपल्या.