नवी दिल्ली : भारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे, असे वादग्रस्त विधान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर भारताच्या क्रिकेटपटूंनी आफ्रिदीवर जोरदार टीका केली होती. पण आफ्रिदीने पहिल्यांदाच असे वक्तव्य केलेले नाही, यापूर्वीही त्याने काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पण तो अशी वादग्रस्त विधानं का करतो, हा प्रश्न काही जणांना नक्कीच पडला असेल, याचे कारणही आता पुढे आले आहे.
आफ्रिदीचा चुलत भाऊ शकिब हरकत उल अंसार हा दहशतवादी होता. काश्मीर येथील अनंतनाग येथे त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल होते. जवळपास दोन वर्षे त्याने आपली दहशत पसरवली होती. अनंतनागमध्ये भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीमध्ये आफ्रिदीचा भाऊ मारला गेला. आपल्याबरोबर युवकांना जोडण्यासाठी शकिब हा आफ्रिदीच्या नावाचा वापर करत होता. शकिब हा, आपले आणि आफ्रिदीचे नाते काश्मीरमधील युवकांना सांगायचा, त्याच्याशी भेट घडवून देण्याचे आश्वासन द्यायचा. पण आफ्रिदीने मात्र, मला भरपूर भाऊ आहेत, असे म्हणत शकिबबरोबरची ओळख नाकारण्याचा प्रयत्न केला होता.
काय बोलला होता आफ्रिदीभारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी स्वातंत्र्य आणि स्व:ताच्या निर्णयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा आवाज दडपशाहीने दाबला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना का पुढाकार घेत नाहीत? हा रक्तपात थांबविण्यासाठी त्या का प्रयत्न करत नाहीत? असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले होते.