नवी दिल्ली : शाकिब अल हसन याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डने त्याच्या समर्पित वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बीसीबी अध्यक्ष नजमुल हसन यांनी तर त्याला प्रश्न केला. आयपीएलमधील एखाद्या संघात निवड झाल्यास ब्रेक घेशील का? अशी विचारणा शाकिबला करण्यात आली.
शाकिबने आयपीएलसाठी उपलब्ध असल्याचे संकेत देता यावेत म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी खेळण्यास नकार दिला. आयपीएलच्या महालिलावात त्याला दहापैकी एकाही संघाने स्वत:कडे घेतले नाही. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘ब्रेक’चे निमित्त पुढे करीत दक्षिण आफ्रिकेत खेळण्यास नकार दर्शविला. या महिन्याअखेर सुरू होत असलेल्या द. आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची आधीच वन डे आणि कसोटी संघात निवड करण्यात आली होती.
n ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना नजमुल हसन म्हणाले, ‘शाकिबची मानसिक आणि शारीरिक अवस्था चांगली नसती तर त्याने आयपीएल लिलावासाठी स्वत:चे नाव दिले असते का? मात्र त्याने स्वत:चे नाव दिले. याचा अर्थ असा की आयपीएल संघात निवड झाली असती तर त्याने असे केले नसते. शाकिब बांगलादेशसाठी खेळणार नसेल तर आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही ज्यांच्यावर जीव ओवाळतो त्यांच्याविरुद्ध सक्तीचे धोरण राबवित नाही, मात्र शाकिबनेही वारंवार स्वत:चे निर्णय बदलू नयेत.