नवी दिल्ली: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी जवळपास 2000 अर्ज आल्याची चर्चा आहे. पण, त्यात लालचंद राजपूत, रॉबीन सिंग, टॉम मुडी, माईक हेसन ही नाव अधिक चर्चेत आहेत. तरीही मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांचीच वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. कर्णधार विराट कोहलीनंही आपलं वजन शास्त्रींच्या मागे उभे केले आहे. पण, मुख्य प्रशिक्षकपदाच्या कामगिरीचा विचार केल्यास शास्त्री हे अनिल कुंबळे आणि गॅरी कर्स्टर्न यांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे दिसून येते.
विश्वचषकानंतर रवि शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ 45 दिवसांसाठी वाढविण्यात आला आहे. याआधीही त्यांनी टीम इंडियाचे संचालक पद सांभाळले होते. त्याच्या कार्यकाळात भारताने 2015 व 2019चे विश्वचषक खेळले आहेत. परंतू दोन्ही विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागला होता.
बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासह इतर पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर बंगलोर मिररने केलेल्या दाव्यानुसार मुख्य प्रशिक्षकपदासाठी जवळपास 2000 अर्ज आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माजी व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनीही फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.
कोहलीला मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रीच हवे आहेत आणि हे त्यानं उघडपणे जाहीरही केले आहे. कोहली म्हणाला,'' रवी शास्त्रीच प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल. क्रिकेट सल्लागार समितीनं याबाबत माझ्याकडे मत मागितलेले नाही आणि ही प्रक्रिया कशी पार पाडेल, हेही मला माहीत नाही. पण, सल्लागार समितीनं माझं मत विचारल्यास, मी त्यांच्याशी चर्चा करीन. शास्त्रींसोबत संघ चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला आवडेल असे त्याने स्पष्ट केले. तिन्ही प्रशिक्षकांचा कार्यकाळ पुढील प्रमाणे आहे:
रवि शास्त्रीं यांचा कार्यकाळ:
एकुण कसोटी सामने: 29, विजय: 16, पराभव: 8, अनिर्णित: 5
वन डे सामने: 79, विजय: 52, पराभव: 24
ट्वेंटी- 20 सामने: 54, विजय: 36, पराभव: 17
अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ:
एकुण कसोटी सामने: 17, विजय: 12, पराभव: 1, अनिर्णित: 4
एकुण वन डे सामने: 13, विजय: 8, पराभव: 5
एकुण ट्वेंटी- 20 सामने: 5, विजय: 2, पराभव: 2
गॅरी कर्स्टन यांचा कार्यकाळ:
एकुण कसोटी सामने: 33, विजय: 16, पराभव: 6, अनिर्णित: 11
गॅरी कर्स्टन यांच्या नेतृत्वात भारताने 2011 साली वन डे विश्वचषक जिंकला होता.