Join us  

शेफाली करणार वन डेत पदार्पण, मालिका आजपासून

भारत- इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची मालिका आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 5:38 AM

Open in App
ठळक मुद्देद. आफ्रिकेविरुद्ध स्थानिक मालिकेसाठी शेफालीचा भारतीय संघात विचार झाला नव्हता. ही मालिका भारताने गमावली. इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करीत भारतीय संघ त्या पराभवाची भरपाई करण्यास इच्छूक आहे

ब्रिस्टल : भारतीय संघ विश्व चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका आजपासून खेळणार आहे. रविवारी पहिला सामना होणार असून युवा खेळाडू शेफाली वर्मा या सामन्याद्वारे पदार्पण करणार आहे. १७ वर्षांच्या शेफालीने २२ टी-२० सामने खेळले असून कामगिरीच्या बळावर विश्व क्रिकेटचे लक्ष वेधले आहे.

द. आफ्रिकेविरुद्ध स्थानिक मालिकेसाठी शेफालीचा भारतीय संघात विचार झाला नव्हता. ही मालिका भारताने गमावली. इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करीत भारतीय संघ त्या पराभवाची भरपाई करण्यास इच्छूक आहे. भारताला द. आफ्रिकेकडून १-४ ने पराभवाचा धक्का बसला. मालिकेतून शेफालीला वगळल्यावरुन फारच टीका झाली होती. संघ व्यवस्थापनाने बोध घेत इंग्लंडविरुद्ध तिला संधी देण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटीत शेफालीने क्रमश: ९६ आणि ६३ धावा केल्या. 

तिच्या स्फोटक फलंदाजीचा क्षमतेचा परिचय घडल्यामुळे शेफालीला वन डे संघात स्थान मिळाले. उपकर्णधार हरमनप्रीत कौरचा अपवाद वगळता संघात झटझट धावा काढणाऱ्यांचा अभाव आहे. शेफालीच्या समावेशामुळे धावा काढणारी फलंदाज संघात असल्याचा विश्वास निर्माण झाला. स्मृती मानधनासोबत शेफाली सलामीला खेळण्याची शक्यता आहे. पुनम राऊत तिसऱ्या स्थानावर व त्यानंतर कर्णधार आणि उपकर्णधार खेळणार आहेत. याशिवाय फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजीची क्षमता आसलेली स्नेह राणा ही देखील संघात स्थान पटकवू शकते. इंग्लंडकडून सोफिया डंक्ले हिला पदार्पणाची संधी मिळू शकते.

उभय संघ यातून निवडणार

भारत : मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्स, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, एकता बिश्त, राधा यादव, पूनम यादव, प्रिया पूनिया आणि इंद्राणी रॉय इंग्लंड: हीथर नाईट (कर्णधार),टॅमी ब्यूमोंट, केट क्रॉस, नेट स्किवर, सोफिया डंक्ले, लॉरेन विनफील्ड-हिल, आन्या श्रबसोल, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, एमी जोन्स , फ्रेया डेविस, टॅश फारंट, सारा ग्लेन,मॅडी विलियर्स, फ्रॅन विल्सन आणि एमिली अर्लोट. 

सामना: दुपारी ३.३० पासून भारतीय वेळेनुसार