देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. गुरुवारी ३ लाख ८६ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्थाही कोलमडत चालली आहे. अशात समाजातील दिग्गज मंडळी पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आली आहेत. शुक्रवारी पंजाब किंग्सचा फलंदाज निकोलस पूरन यानं त्याच्या आयपीएल पगारातील काही रक्कम कोरोना लढ्यात भारताला मदत करण्याचे जाहीर केले. राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जयदेव उनाडकट यानंही त्याच्या पगारातील १० टक्के रक्कम वैद्यकिय उपकरणांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. आता दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानंही पुढाकार घेतला आहे. त्यानं 'Mission Oxygen'साठी २० लाखांची मदत जाहीर केली. शिवाय आयपीएलमध्ये मिळणाऱ्या सर्व पुरस्कारांची बक्षीस रक्कमही तो या मोहिमेत देणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात जाताच होऊ शकते पाच वर्षांची जेल किंवा ५० लाखांचा दंड!
तो म्हणाला,''आपण आता अनपेक्षित संकटात आहोत आणि या काळात एकमेकांना शक्य तेवढी मदत करण्याची जबाबदारी आपली आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळताना अनेक वर्ष तुमचं भरभरून प्रेम मला मिळालं आणि त्याचा मी ऋणी आहे. आता या देशातील लोकांना मदत करण्याची माझी वेळ आहे. मी Mission Oxygen साठी २० लाखांची मदत जाहीर करत आहे. त्याशिवाय आयपीएलमधून मिळणारी बक्षीस रक्कमही मी या मोहिमेत दान करणार आहे.''
''अहोरात्र या संकटापासून आपल्याला वाचवणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचे मी आभार मानतो. आम्ही आजन्म तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहणार आहोत. मी सर्वांना आवाहन करतो की नियमांचं पालन करा, मास्क घाला, सॅनिटाईज वापरा अन् सामाजिक अंतर राखा. आपण हा लढा जिंकू शकतो,''असेही धवननं लिहिलं आहे.