पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) यांचा मुलगा इझानची प्रकृती खालावली आहे. यामुळे शोएबला बांगलादेशविरुद्धची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका अर्ध्यावरच सोडावी लागली आहे. मालिकेतील तिसरा सामना आज होणार आहे, मात्र यासाठी मलिक संघात नसेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यासंदर्भात माहिती दिली.
मलिक आणि सानिया यांचा मुलगा इझान तीन वर्षांचा आहे. पीसीबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, "शोएब मलिकचा मुलगा आजारी पडला आहे. यामुळे मलिक सोमवारवी बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात खेळू शकणार नाही. कारण तो समन्यापुरवीच दुबईला रवाना झाला आहे." नुकताच संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेला पाकिस्तान तीन सामन्यांच्या या टी20 इंटरनॅशनल सीरीजमध्ये 2-0 पुढे आहे.
पीसीबीने असेही म्हटले आहे, की या सामन्यानंतर कसोटी संघाचे सदस्य चितगावला रवाना होतील. तर टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचे सदस्य मंगळवारी दुबईमार्गे पाकिस्तानला परततील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामने होणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी चितगाव येथे (शुक्रवारपासून) तर दुसरी कसोटी ढाका येथे 4 ते 8 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.